दिघोडे गावची अवनी कोळी आशियाई शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचं करणार प्रतिनिधित्व

दिघोडे गावची अवनी कोळी आशियाई शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार
उरण (विठ्ठल ममताबादे) :
  नेमबाजी हा कौशल्य, अचूकता आणि धैर्य यांचा संगम असलेला क्रीडा प्रकार आहे. रायफल, पिस्तूल, शॉटगन, ट्रॅप, स्कीट अशा विविध प्रकारांमधून खेळाडू लक्ष्यांवर गोळी झाडतात. भारतातील अनेक खेळाडू या खेळात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत. अशाच एक प्रतिभावान आणि जिद्दी खेळाडूची ओळख म्हणजे दिघोडे गावची अवनी अलंकार कोळी – सामान्य घरात जन्मलेली, पण असामान्य कर्तृत्वाची मालकीण.
उरण तालुक्यातील अवनीने आपल्या वडिलांच्या प्रेरणेने आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने वयाच्या १२व्या वर्षी पिस्तूल शुटिंगपासून सुरुवात केली. तिच्या आईवडिलांनी समाजाच्या “मुलींसाठी बंदूक नको” या रूढ समजांना छेद देत तिच्या हातात बंदूक दिली. तिच्या वडिलांनी स्वतः राष्ट्रीय नेमबाज व प्रशिक्षक म्हणून तिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली. शॉटगन शुटिंगसारख्या महागड्या खेळात, साध्या किटवर सराव करत तिने डझनावधी पदकं जिंकली. तिचा भाऊ अर्णवही या परंपरेत पुढे जात आहे.
२०२३ मध्ये बालेवाडी, पुणे येथे डबल ट्रॅप शिकून तिने महाराष्ट्र टीममध्ये प्रवेश मिळवला. २०२४-२५ मध्ये दोन राष्ट्रीय सुवर्णपदकांची कमाई करून तीने स्वतःचं स्थान पक्कं केलं. आता ती १४ ते २८ ऑगस्ट २०२५ दरम्यान कझाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशियाई शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. रायगड आणि नवी मुंबई विभागातून राष्ट्रीय संघात निवड होणारी पहिली महिला नेमबाज म्हणून अवनी कोळीचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जात आहे. तिच्या या यशामागे कुटुंब, शाळा, प्रशिक्षक आणि गावकऱ्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *