केळवणे को.ए.सो. हायस्कूलची तालुका क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी; तीन संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र

केळवणे को.ए.सो. हायस्कूलची तालुका क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी; तीन संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र
उरण (विठ्ठल ममताबादे ) :
केळवणे येथील को.ए.सो. हायस्कूल शाळेने पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गेल्या काही दशकातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करत शाळेने तालुक्यात आपली छाप उमटवली आहे.
या स्पर्धेत शाळेच्या तीन संघांनी अंतिम फेरीत दमदार विजय मिळवत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे. अंडर-१४ वयोगटातील मुलींच्या संघाने चावणे विद्यालयावर विजय मिळवला, अंडर-१७ वयोगटातील मुलींच्या संघानेही चावणे विद्यालयाचा पराभव केला तर अंडर-१७ वयोगटातील मुलांच्या संघाने कासारभट इंग्लिश मिडियम स्कूल विरुद्ध निर्णायक सामना जिंकला.
यासोबतच तालुका अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा २०२५ मध्येही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पूर्वा नवनीत मोकल हिने ४०० मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक, कु. मुग्धा भास्कर म्हात्रे हिने ८०० मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक तर यश विजय ठाकूर याने ८०० मीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेचा क्रीडा क्षेत्रातील आत्मविश्वास व प्रतिष्ठा अधिकच वृद्धिंगत झाली आहे. मुख्याध्यापक रामचंद्र गणा पाटील, क्रीडा शिक्षक अनमोल पगारे, देविदास गागुर्डे व संपूर्ण शिक्षकवृंद तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रेम म्हात्रे, अमित पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *