छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगड येथील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची विकासकामे आणि ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनातील अनियमिततेविरोधात पुण्यात शिवप्रेमी आणि तरुणांनी भव्य बाईक रॅली काढून तीव्र निषेध व्यक्त केला. किल्ले रायगड विकास प्राधिकरण बरखास्त करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला.
ही रॅली लाल महाल येथून सुरू होऊन छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथे समाप्त झाली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक, शिवभक्त आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. घोषणाबाजी आणि फलकांच्या माध्यमातून आंदोलकांनी रायगडावरील विकासकामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
आंदोलकांनी रायगड विकास प्राधिकरणावर गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करून त्यांचे निलंबन करण्याची मागणी केली. रायगडावर सुरू असलेली निकृष्ट दर्जाची कामे त्वरित थांबवून पुढील १५ दिवसांत नवीन समिती स्थापन करून नियोजनबद्ध काम करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच संबंधित ठेकेदारांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशी भूमिकाही आंदोलनकर्त्यांनी मांडली.
रायगडावरील सर्व विकासकामांचे नियमित थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावे, तसेच संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. निर्णय घेणारे प्रशासकीय अधिकारी, संबंधित व्यक्ती आणि ठेकेदार यांच्याकडून झालेल्या नुकसानीची व्याजासकट वसुली करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रायगडावरील नव्याने बांधलेल्या पायरीमार्गालगतची संरक्षण भिंत कोसळल्यास पर्यटकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. भविष्यात अशा दुर्घटनेत जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी प्राधिकरण स्वीकारणार का, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
याशिवाय टकमक टोक येथील गंजलेले आणि तुटलेले लोखंडी सुरक्षा रेलिंग तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. रायगडावरील सुरक्षितता, कचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधांमधील दिरंगाईबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
तसेच रायगड परिसरातील २१ गावांमधील ऐतिहासिक वास्तू आणि पुरातन वस्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे आंदोलकांनी सांगितले. वाघबिळ आणि नाचण टेपची गुहा परिसरात सापडलेल्या अश्मयुगीन अवशेषांचे योग्य संवर्धन करून त्या ठिकाणी सुरक्षित रस्ता तयार करावा, अशीही मागणी करण्यात आली.
मानवी हस्तक्षेपामुळे रायगडावर वारंवार लागणाऱ्या वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, तसेच रायगडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील मान कायम राखण्यासाठी संवर्धन अधिक प्रभावीपणे करण्यात यावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.