कशेडी घाटात अपघात! पेप्सी बॉटल्सचा कंटेनर पलटी, एक लेन पूर्ण बंद

Kashedi accident
पोलादपूर | शैलेश पालकर
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ चे चौपदरीकरण होऊन तो आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ झाला असला, तरी कशेडी घाटातील धोकादायक तीव्र उतार व वळणे कायम राहिल्याने अपघातांचे सत्र थांबलेले नाही. बुधवारी सकाळी कशेडी घाटात मुंबईकडे जात असलेला पेप्सी बॉटल्सने भरलेला कंटेनर कलंडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका लेनची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
दरम्यान,  लोटे ते भिवंडी वाडा येथे पेप्सी बॉटल्सची वाहतूक करणारा कंटेनर (क्रमांक एमएच ४३ जीई २२४४) चालक राम आचल मिंद (रा. उत्तर प्रदेश) यांच्या ताब्यात होता. पोलादपूर तालुक्यातील चोळई गावच्या हद्दीतील तीव्र उताराच्या वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कंटेनर रस्त्यावर कलंडला. कंटेनरमधील पेप्सीच्या बॉटल्स महामार्गावर अस्ताव्यस्त पसरल्या, तर चालक केबिन डिव्हायडरवर चढली आणि मागील भाग रस्त्यावर आडवा झाल्याने एक लेन पूर्णपणे बंद झाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंढे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. कशेडी महामार्ग पोलीसही तत्काळ दाखल झाले. पोलादपूर ते गोवा दिशेने वाहतूक एका लेनवरून सुरू ठेवण्यात आल्याने मोठी कोंडी टळली. दरम्यान, महामार्गावर पसरलेल्या बॉटल्स बाजूला करण्याचे व क्रेनच्या सहाय्याने कंटेनर रस्त्याबाहेर काढण्याचे काम पोलीस देखरेखीखाली सुरू होते. चौपदरीकरणानंतरही कशेडी घाटातील अपघातप्रवण वळणे व उतार न हटवल्याने येथे अपघातांची मालिका कायम असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *