उरण तालुक्यातील दिघोडे कोळीवाडा येथे पारंपारिक कोळी समाज मच्छिमार सहकारी संस्थेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा

Dighode machchimar
उरण | विठ्ठल ममताबादे 

रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी उरण तालुक्यातील दिघोडे कोळीवाडा येथे “पारंपारिक कोळी समाज मच्छिमार वि. का. स. संस्था मर्यादित, दिघोडे” या सहकारी संस्थेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला.

गोर-गरीब कोळी बांधवांचे प्रश्न मार्गी लागावेत तसेच शासनाच्या विविध योजना व सुविधा कोळी समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अशोक कोळी व सेक्रेटरी प्रितेश कोळी यांनी दिली.

स्वर्गीय केशव बुधाजी नाखवा सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून रमेश भास्कर कोळी, सीताराम जनार्दन नाखवा, महेंद्र हरिश्चंद्र चोगले तसेच दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तिनिधी हसुराम ठाकुर व उपसरपंच कैलास अंबाजी म्हात्रे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शकांनी कोळी समाजाचा गौरवशाली इतिहास, सद्यस्थिती आणि भविष्यातील दिशा यावर सखोल मार्गदर्शन करत उपस्थित कोळी बांधवांना संबोधित केले.

या उद्घाटन समारंभास विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहाकोळीवाडा सोसायटीचे चेअरमन गोविंद कोळी, गव्हाण सोसायटीचे चेअरमन हितेश कोळी, मोठीजुई सोसायटीचे चेअरमन माणिक कोळी यांच्यासह संस्थेचे खजीनदार राजाराम कोळी, सदस्य तुकाराम नाखवा, हरिश्चंद्र नाखवा, हिराजी नाखवा, जयश्री नाखवा, धनवंती कोळी, रेश्मा कोळी, विजय कोळी, हरेश कोळी तसेच दिघोडे गावातील नागरिक, डी. डी. कोळी, के. डी. कोळी, दत्ता कोळी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविकपर मनोगत प्रितेश काशीनाथ कोळी यांनी केले, तर समारोप संस्थेचे चेअरमन अशोक जनार्दन कोळी यांनी मान्यवरांचे आभार मानून केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *