उरण तालुक्यातील कोप्रोली परिसरात सायंकाळी ५.४७ वाजण्याच्या सुमारास २.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. अचानक बसलेल्या या कंपनामुळे उरण तालुका काही क्षणांसाठी हादरला आणि नागरिकांमध्ये क्षणिक घबराट निर्माण झाली.
घरातील भांडी, पंखे तसेच दरवाजे हलल्याचा अनुभव काही नागरिकांनी व्यक्त केला. सोशल मीडियावर भूकंपाबाबत संदेश व्हायरल झाल्याने परिसरात चर्चा रंगली. मात्र भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
धक्का बसताच स्थानिक प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाल्या. कोप्रोली परिसरात तात्काळ पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तहसीलदार, उरण यांनी नागरिकांना दिलासा देत ‘सर्व काही सुरळीत असून घाबरून जाण्याचे कारण नाही’ असे स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारची संरचनात्मक हानी आढळलेली नसल्याचेही सांगण्यात आले.
तज्ज्ञांच्या मते, २.४ तीव्रतेचा भूकंप हा सौम्य स्वरूपाचा असतो आणि अशा धक्क्यांमुळे मोठे नुकसान सहसा होत नाही. तरीही नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अचानक कंपनामुळे काही काळ धास्ती निर्माण झाली असली तरी मोठा धोका टळल्याने उरणकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.