आषाढी यात्रेत VIP दर्शनाला पूर्णविराम; १० जुलैपासून पंढरपुरात ‘नो-व्हेईकल झोन’ लागू

पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद
मुंबई | विशेष प्रतिनिधी 
आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना यंदा अधिक सुलभ आणि समान दर्शनाची सुविधा मिळणार आहे. राज्य शासनाने १० जुलै २०२६ पासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी (VIP) दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसर ‘नो-व्हेईकल झोन’ घोषित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतून लाखो वारकरी पायी व विविध मार्गांनी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. मात्र, व्हीआयपी दर्शनासाठी सामान्य भाविकांची रांग वारंवार थांबवली जात असल्याने तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत होती. ही गैरसोय दूर करून सर्व वारकऱ्यांना समान व जलद दर्शन मिळावे, या उद्देशाने राज्य शासनाने १० जुलै २०२६ पासून व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानंतर कोणत्याही विशेष श्रेणीसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था राहणार नसून सर्व भाविकांना एकाच रांगेतून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे दर्शन व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्याबरोबरच वारकऱ्यांचा वेळही वाचणार आहे. याशिवाय आषाढी वारीदरम्यान मंदिर परिसरातील वाढती गर्दी, वाहतूक कोंडी आणि भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून मंदिर परिसर ‘नो-व्हेईकल झोन’ घोषित करण्यात आला आहे. या परिसरात वाहनांना प्रवेशबंदी राहणार असून, त्यामुळे भाविकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि अपघाताच्या भीतीविना सुरक्षितपणे मंदिर परिसरात वावरता येणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे यंदाच्या आषाढी यात्रेत दर्शन व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि वारकरी-केंद्रित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.