पेण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित हॅट्रिक नगराध्यक्षा प्रितम ललित पाटील यांचे स्वागत बुधवारी, दि. ७ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात करण्यात आले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी अधिकृत पत्र देत प्रितम पाटील यांना नगराध्यक्ष पदाचा पदभार प्रदान केला. यानंतर नगरपरिषद सभागृहात पार पडलेल्या पदग्रहण सोहळ्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जंगी सत्कार केला.
पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमदार रवीशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यावतीने प्रितम पाटील यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी ‘आम्ही पेणकर विकास आघाडी’च्या उमेदवार रिया धारकर यांचा ५ हजार ८६१ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे शहराच्या राजकारणात भाजप-राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व अधिक बळकट झाले आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर प्रितम पाटील यांनी निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या समस्या थेट मांडण्यासाठी लवकरच हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी आमदार रवीशेठ पाटील यांनी शहरातील रस्ते व गटारे सुसज्ज करण्यात येणार असून पेणकरांना पुढील ५० वर्षे पुरेल एवढे पाणी हटवणे धरणातून आरक्षित करून फिल्टरद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाणार असल्याचे सांगितले. यासाठी राज्य शासनाकडून १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर होण्याच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.