Lenskart कर्मचारी धोरणांवरून अलिबागमध्ये वाद; स्पष्टीकरणासाठी ८ दिवसांचा अल्टिमेटम

अलिबाग | अमुलकुमार जैन
लेन्सकार्ट कंपनीच्या कर्मचारी धोरणांबाबत समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या माहितीनंतर अलिबागमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. हिंदू कर्मचाऱ्यांना कुंकू, बिंदी तसेच धार्मिक दोरे (कलावा) वापरण्यास कथित निर्बंध घालण्यात आल्याचा दावा समोर येत असून, यावर भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष स्वप्नील शशिकांत गाडे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
या संदर्भात गाडे यांनी अलिबाग येथील लेन्सकार्ट स्टोअर व्यवस्थापकांना लेखी निवेदन देत कंपनीकडून तातडीने अधिकृत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, जर अशा प्रकारचे धोरण अस्तित्वात असेल, तर ते धार्मिक समानतेच्या तत्त्वाला बाधा देणारे असून कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव निर्माण करणारे ठरू शकते.
दरम्यान, लेन्सकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष बन्सल यांनी संबंधित वृत्ताचे खंडन केल्याचे समोर आले आहे. मात्र, कंपनीकडून याबाबत अधिकृत लिखित निवेदन जाहीर न झाल्याने संभ्रमाचे वातावरण कायम असल्याचे गाडे यांनी नमूद केले. त्यामुळे अफवा आणि वास्तव यातील फरक स्पष्ट करण्यासाठी कंपनीने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
तसेच, आठ दिवसांत समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अलिबाग परिसरात या विषयाची जोरदार चर्चा सुरू असून, कंपनीकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.