मुंबईतील 1999 मधील एका कुख्यात एन्काउंटरचा सूड तब्बल 27 वर्षांनी उगवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंड सादिक कालियाच्या मृत्यूस जबाबदार मानल्या जाणाऱ्या खबऱ्याची त्याच्या पुतण्याने अत्यंत क्रूरपणे हत्या केली. या प्रकरणाचा छडा लावत मुंबई पोलिसांनी आरोपींना नागपूरमधून अटक केली आहे.
मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, 1999 साली पोलीस चकमकीत ठार झालेल्या सादिक कालियाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याचा पुतण्या सादिक जवार गेली अनेक वर्षे संधी शोधत होता. अखेर त्याने 20 एप्रिल रोजी नागपाडा परिसरात 78 वर्षीय इक्बाल इब्राहिम सेलिया यांची निर्घृण हत्या केली. सेलिया यांच्यावर धारदार शस्त्रांनी 20 पेक्षा अधिक वार करण्यात आले होते.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सेलिया यांनीच एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या पथकाला सादिक कालियाबाबत माहिती पुरवली होती, असा आरोपींचा आरोप आहे. याच कारणावरून ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी चौकशीदरम्यान दिली आहे.
हत्येच्या दिवशी सेलिया घरी एकटे असताना दोन हल्लेखोरांनी घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. घटनेनंतर आरोपींनी सीसीटीव्हीपासून बचाव करण्यासाठी अँटॉप हिल, विद्याविहार, कल्याण असा मार्ग बदलत पळ काढला आणि अखेर नागपूरला पोहोचले.
नागपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी नागपूरमध्ये सापळा रचून सादिक जवार (वय 29) आणि त्याचा साथीदार नौशाद मिथानी (वय 22) यांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी या कारवाईची पुष्टी केली असून पुढील तपास सुरू आहे.
सादिक कालियाचा गुन्हेगारी प्रवास
1990 च्या दशकात सादिक कालिया काळाचौकी परिसरात फूटपाथवर बूट विकत असे. पुढे त्याने अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश करत दाऊद इब्राहिम याच्या टोळीला खंडणी देण्यास नकार दिला आणि छोटा शकील यांच्या गटात सामील झाला. त्यानंतर त्याने मुन्ना झिंग्रासह अनेक गंभीर गुन्हे केले. नोव्हेंबर 1999 मध्ये एका बड्या नेत्याच्या हत्येचा कट रचताना पोलीस चकमकीत त्याचा अंत झाला.