उरण | विठ्ठल ममताबादे
दादर येथे जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटतर्फे २४ एप्रिल २०२६ रोजी १३५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छबीलदास हायस्कूलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, दादर, मुंबई यांच्या वतीने संस्थेचा १३५ वा वर्धापन दिन छबीलदास हायस्कूल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला मुंबईचे उपमहापौर संजय घाडी, मुकुंद चितळे, देवचंद राका यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
यावेळी कै. गो. ना. अक्षीकर विद्यासंकुलातील ज. ए. ई. ची इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा, उरण येथील मुख्याध्यापिका ज्योती पाटील यांना “आदर्श मुख्याध्यापिका” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच एन. आय. हायस्कूलमधील वरिष्ठ लिपिक प्रदीप म्हात्रे यांना विद्यार्थ्यांसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल “आदर्श पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात बजावलेल्या उल्लेखनीय सेवेमुळे ज्योती पाटील व प्रदीप म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोघांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
