तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षामध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे कार्यकर्ते आणि एकेकाळचे मनसेचे विधानसभा उमेदवार तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक सुरेंद्र (आण्णा) चव्हाण तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील वैद्यकीय दूत कृष्णा कदम यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश निवडणूक प्रमुख सतिश धारप तसेच जिल्हाध्यक्ष व खासदार धैर्यशील पाटील तसेच आ. रवीशेट पाटील यांच्या हस्ते पार पडला. या पक्षप्रवेशानंतर भाजपचे सर्वात आधी इच्छुक झालेल्या वैभव चांदे यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर व्हावे लागले आहे.
या कार्यक्रमास भाजपचे बिपिनदादा म्हामुणकर, नागेंद्र राठोड, पोलादपूर तालुकाध्यक्ष वैभव चांदे, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
यानंतर दुसऱ्याच दिवशी लोहारे जिल्हा परिषद गटातून कृष्णा कदम यांनी तर कोतवाल पंचायत समिती गणातून सुरेंद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पोलादपूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून एका राजकीय गटाचे मोठया प्रमाणात विभाजन सुरू असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा काँग्रेस नंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तेथून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यापैकी काहीजणांचा भाजपमध्ये प्रवेश झाला असून नजिकच्या काळात हा राजकीय गट भाजपमय होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मात्र, या गटाची महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटासोबत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकपूर्व युती झाल्याने सद्यस्थितीत हा गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकदिलाने काम करीत असल्याने भाजपची ताकद लोहारे जिल्हा परिषद गटामध्ये वाढलेली दिसून येत आहे.
भाजपचे भुमिपुत्र तसेच प्राधिकरणाचे कॅबिनेट दर्जाचे अध्यक्ष आ.प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील माजी मंडळ अध्यक्ष प्रसन्ना पालांडे यांच्या विचाराने पोलादपूर शहराध्यक्ष महेश निकम आदिंनी या दोन्ही कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले आहे.