महाड तालुक्यातील राजेवाडी मोहल्ल्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून, घरात घुसून मारहाण करत मानेवर विळा धरून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जैद गनी कारविनकर (वय ३०, रा. राजेवाडी) आणि फिर्यादी अहमद हारून जोगीलकर हे दोघेही एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. २१ जानेवारी रोजी फिर्यादी आपल्या घरी असताना आरोपीने त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. यानंतर आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर, फिर्यादीला घराबाहेर ओढून नेऊन त्यांच्यावर अधिक हल्ला करण्यात आला.
या प्रकारानंतर आरोपीने आपल्या हातातील विळा थेट फिर्यादीच्या मानेवर धरत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपी याठिकाणीच न थांबता, पुन्हा फिर्यादीवर दगडफेक केली. तसेच फिर्यादी यांच्या भावजय आणि तिच्या अल्पवयीन मुलालाही धमकावल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे राजेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गंभीर प्रकाराबाबत फिर्यादीने महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी जैद गनी कारविनकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. ही घटना महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आली असून, सहाय्यक फौजदार लांगे हे पुढील तपास करत आहेत.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे राजेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून, पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.