राज्यात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. गेल्या १५ दिवसांत किरकोळ बाजारात साखर ७ ते ८ रुपयांनी महागली असून मोठ्या साखरेचा दर प्रतिकिलो ५२ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. उत्पादनातील घट, पावसाची अनिश्चितता आणि केंद्र सरकारच्या कमी कोट्यामुळे बाजारात साखरेची तेजी कायम आहे.
केंद्र सरकारने जुलै महिन्यासाठी देशांतर्गत बाजारात साखरेचा कोटा कमी केल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. २०२५-२६ च्या गाळप हंगामात अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, कारखान्यांकडील घटलेला साठा आणि ऊस पट्ट्यात जून-जुलै महिन्यात झालेला अपुरा पाऊस यामुळे आगामी हंगामात साखरेचे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, घाऊक बाजारात महिनाभरात प्रतिक्विंटल सुमारे ६०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
श्रावण, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी तसेच लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. खाद्य उत्पादक कंपन्यांकडून आगाऊ खरेदी वाढल्याने बाजारात तेजी कायम असून व्यापाऱ्यांच्या मते आगामी काही महिने साखरेचे दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. सध्या बारीक साखरेचा किरकोळ दर ४७ रुपये, मध्यम साखरेचा ४८ रुपये आणि मोठ्या साखरेचा ५२ रुपये प्रतिकिलो इतका झाला असून या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे घरगुती बजेट विस्कळीत झाले आहे.