अलिबागच्या हातावरील भंडारी खेळी नारळ फोडी स्पर्धेत विशाल मुणगेकर महाविजेता; पारंपरिक क्रीडा संस्कृतीला मिळाला नवा आयाम

अलिबाग | अमुलकुमार जैन
कोकणच्या पारंपरिक क्रीडा संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने कित्ते भंडारी हितवर्धक मंडळ, अलिबाग-रायगड यांच्या वतीने आयोजित ‘हातावरील भंडारी खेळी नारळ फोडी स्पर्धा’ (पर्व-१) अलिबाग येथील भंडारी भवनमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. रायगड, सिंधुदुर्गसह विविध भागांतील खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत मालवण येथील विशाल मुणगेकर यांनी दमदार कामगिरी करत महाविजेतेपद पटकावले.
स्पर्धेत खेळाडूंनी हाताच्या ताकदीबरोबरच अचूक फटक्यांचे कौशल्य दाखवत उपस्थितांची दाद मिळवली. प्रथम क्रमांकाच्या विशाल मुणगेकर यांना डबल डोअर फ्रिज, द्वितीय क्रमांकाच्या किरण राऊत यांना वॉशिंग मशीन, तृतीय क्रमांकाच्या दीप केरकर यांना स्मार्ट टीव्ही, तर चतुर्थ क्रमांकाच्या गजानन दामोदर मोरे यांना सायकल आणि भव्य चषक प्रदान करण्यात आला. विशेष पुरस्कारांमध्ये किरण राऊत यांनी एका नारळाने सलग १३ नारळ फोडत ‘उत्कृष्ट नारळ’ पुरस्कारासह मायक्रो ओव्हन जिंकला, तर मनोज मयेकर यांना ‘उत्कृष्ट फटकेबाज’ आणि संतोष हळदणकर यांच्या संघाला ‘उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमात रुद्रा पिळणकर हिने दांडपट्टा आणि लाठी-काठीचे थरारक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक राजनभाई नार्वेकर, विश्वस्त नरहरी धनाजी तथा तोडणकर गुरुजी, अध्यक्ष कमलाकर पडवळ, उपाध्यक्ष मधुकर पारकर, यशवंत राऊत, संजय राऊत, प्रसन्न खडपे, सरपंच प्राजक्ता खडपे, प्रफुल्ल मोरे, माजी सरपंच सुरेश खोत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. शुभांगी कवळे आणि जगदीश राऊत यांनी सूत्रसंचालन केले. पारंपरिक खेळांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित ही स्पर्धा यशस्वी ठरली असून, भविष्यात अशा उपक्रमांचे अधिक मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.