आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे “आरोग्याची वारी पंढरीच्या दारी” या उपक्रमांतर्गत पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली २५ जुलै २०२६ रोजी रायगड वारकरी भवन, पंढरपूर येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले. ह.भ.प. गणेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सेवाभावी उपक्रमातून हजारो वारकऱ्यांना आरोग्यसेवेचा लाभ मिळाला. डॉक्टरांनी समाजसेवेच्या भावनेतून दिलेल्या या सेवेमुळे त्यांनाही मोठे मानसिक समाधान लाभत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या वारीची सुरुवात २४ जुलै रोजी पनवेल येथील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने प्रती बालाजी-नारायणपूर, जेजुरी येथील खंडोबा मंदिर आणि मोरगावच्या श्री गणपतीचे दर्शन घेत सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण रामा पाटील यांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला. अकलूज येथे डॉ. विवेक देवकाते यांच्या निवासस्थानी मुक्काम केल्यानंतर पंढरपूरमध्ये सेवा उपक्रम पार पडला. या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष डॉ. वैभव मोकल, उपाध्यक्ष डॉ. वैष्णवी नाईक, सहखजिनदार डॉ. सुदर्शन मेटकर यांच्यासह डॉ. वैभव पाटील, डॉ. स्वप्नील लोखंडे, डॉ. आशिष गांधी, डॉ. नरेश पाटील, डॉ. राजेश गांधी, डॉ. रसिका पाटील, डॉ. स्वप्नील बाविस्कर, डॉ. अमित दवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.