शिलार धरण प्रकल्पाविरोधातील विरोधाचा लाट दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.या प्रकल्पामुळे विस्थापनाचा आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्तांनी आता थेट प्रशासनाच्या विरोधात आवाज बुलंद केला आहे. कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पाथरज, ग्रुप ग्रामपंचायत कशेळे, ग्रुप ग्रामपंचायत मोगरज आणि ग्रुप ग्रामपंचायत रजपे या चारही ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामसभेत शिलार धरण प्रकल्पाविरोधात ठराव बहुमताने मंजूर केला आहे. या सर्व ठरावांच्या प्रती जोडून सोमवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी रायगड किशन नारायण जावळे यांच्याकडे औपचारिक अर्ज व स्मरणपत्र सादर करण्यात आले.
ग्रामस्थांनी यावेळी स्पष्टपणे नमूद केले की, प्रस्तावित शिलार धरण प्रकल्पामुळे केवळ शेती आणि जंगलावर नव्हे तर त्यांच्या पिढीजात वास्तव्यावर गदा येणार आहे. त्यामुळे ग्रामसभांनी एकमुखाने या प्रकल् तेपाला नकार दिला असून, शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या जनआंदोलनात भाजप कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ यांनी सक्रिय भूमिका घेतली असून, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ,ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, “हा प्रकल्प लोकांच्या संमतीशिवाय पुढे नेला जात आहे. ग्रामस्थांच्या आयुष्यावर कुरघोडी करणारा कोणताही निर्णय आम्ही सहन करणार नाही. प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी आम्ही लढा देऊ आणि गरज भासल्यास रस्त्यावर उतरू.” रसाळ यांच्या नेतृत्वाखाली या विषयावर येणाऱ्या काळात मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामसभांचा ठराव स्पष्ट पाथरज ग्रामपंचायतीच्या ठरावात नमूद करण्यात आलं आहे की, शिलार धरण प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या गतीमध्ये असला तरी त्याचा थेट परिणाम स्थानिक जनजीवनावर होणार आहे. म्हणून हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.
अशाच स्वरूपाचे ठराव कशेळे, मोगरज आणि रजपे या ग्रामपंचायतींनी देखील मंजूर केले आहेत. प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींचं म्हणणं आहे की, प्रशासनानं अद्याप त्यांच्या भावनांचा आणि हिताचा विचार केलेला नाही. या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ एकत्र आले असून, शासनानं दुर्लक्ष केल्यास विस्तृत जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिलार धरण प्रकल्पाविरोधात आता लोकांमध्ये तीव्र नाराजी असून, चारही ग्रामपंचायतींच्या ठरावामुळे हा प्रश्न राजकीय आणि सामाजिक पातळीवर गतीमान झाला आहे. आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.