पुणे जिल्ह्यातील भांबुर्डा वनपरिक्षेत्रालगतच्या वाहनांच्या झडतीमध्ये कोटयवधी रूपये आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत असलेली व्हेल माशाची उलटी हस्तगत करण्यात आली. यावेळी चार तरूणांपैकी एक मास्टरमाईंड तरूण पळून जाण्यात यशस्वी झाला असला तरी महाड तालुक्यातील दोन व पोलादपूर शहरातील एका तरूणावर झडप घालण्यात वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना यश आले असून शुक्रवारी आरोपींची धरपकड करण्यात आल्याची अधिकृत माहिती संबंधित अधिकृत सूत्रांनी दिली.
महाड व पोलादपूर तालुक्यातील तरूणांना व्हेल माशाची उलटी म्हणजे अम्बरग्रीस या तरंगणारे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदार्थाची तस्करी करण्याची संधी मिळाली. त्यानुसार त्यांनी पुणे परिसरात व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यासाठी एक इनोव्हा कार घेऊन पुर्णपणे योजना आखली. मात्र, वनविभागाला गुप्त सुत्रांमार्फत माहिती मिळाली असल्याने नेमके भांबुर्डा वनपरिक्षेत्रालगत गुरूवारी रात्री तरूणांचे वाहन आढळून आल्यानंतर तरूण टप्प्यात आल्याने वनविभागाने त्यांचा परफेक्ट कार्यक्रम केला.
या छाप्यावेळी एका रोहित शंकर पवार (रा.धामणी,ता.महाड) या तरूणाने चतुराईने स्वत:ला सोडवून पळून जाण्यात यश मिळविले. उर्वरित तरूणांनी आपली ओळख व नांवे लपवून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बुचकळयात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना फारकाळ त्यांची भूमिका टिकवून धरता न आल्याने त्यांची खरी नांवे आणि पत्ता समजणे सोपे गेले. शुक्रवारी सकाळी पुणे न्यायालयामध्ये यापैकी महाड शहरालगत सुंदरवाडी येथील जय धारिया आणि पोलादपूर शहरातील रामजानकी अपार्टमेंटमधून स्वप्निल बबन मोरे (मूळगांव वडाचा कोंड,पोलादपूर)या दोन तरूणांना ताब्यात घेऊन पुणे येथे न्यायालयामध्ये शनिवारी हजर करण्यासाठी नेले. या प्रकरणाची माहिती महाड आणि पोलादपूर शहरामध्ये कोणासही समजणार नाही, याबाबत पुणे भांबुर्डा वनपरिक्षेत्राकडून दक्षता घेण्यात आली असूनही वनविभागाच्या तपासकार्यामुळे काही नागरिकांना या प्रकरणाचा सुगावा लागला आहे. पोलादपूर शहरातून हस्तगत करण्यात आलेल्या तरूणाला अनेक स्थानिकांनी खिशाला महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र लटकवून वावरत असल्याचे पाहिल्याची माहिती प्राप्त झाली.
यासंदर्भात अधिक माहिती मिळविता वनपरिक्षेत्राच्या सुत्रांनी मास्टरमाईंड असलेल्या रोहित शंकर पवार याच्या सांगण्यावरून काही तरूण या व्यवसायात झटपट पैसा मिळवून श्रीमंत होण्यासाठी सहभागी झाले. यापैकी काही तरूण चेहऱ्यावर अतिशय साधेपणा घेऊन वावरत असले तरी त्यांचे पुणे येथे अतिशय उच्चभ्रू श्रीमंतांच्या वस्तीमध्ये वास्तव्य असल्याचे तपासादरम्यान समजून आले, अशी माहिती देताना रोहित पवारला ताब्यात घेतल्यानंतर या व्हेल माशाची उलटी प्रकरणात आणखी किती तरूणांचे रॅकेट अस्तित्वात आहे, याबाबत माहिती उघड होणार असून शनिवारी महाड व पोलादपूर येथून धरपकड करण्यात आलेल्या दोन आरोपींसह छाप्यावेळी पकडलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपासादरम्यान आणखी काही तरूण महाड व पोलादपूर तालुक्यांमधून हस्तगत करण्यात येण्याची वर्तविण्यात येत आहे. पुणे भांबुर्डा वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत व्हेल माशाची उलटी तस्करीची अनेक प्रकरणे मुद्देमालासह उघडकीस आणली असून पुणे भांबुर्डा येथील आरएफओ बारबोले यांनी गुरूवारच्या कारवाईचे नेतृत्व करून तपास कार्य केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.