मोबाईल, सोशल मीडिया आणि बदलत्या जीवनशैलीच्या काळात तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाण्याचा धोका वाढत असताना विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीची जाणीव निर्माण करण्यासाठी मिलिंद जिल्हा व्यसनमुक्ती केंद्राने पुढाकार घेतला. ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत सोमवारी इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत स्वच्छता अभियानासोबतच व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
व्यसनाची सुरुवात अनेकदा कुतूहल किंवा मित्रांच्या आग्रहातून होते. मात्र पुढे त्याचे गंभीर परिणाम व्यक्तीच्या आरोग्यासोबतच कुटुंब, शिक्षण आणि सामाजिक जीवनावर होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक असल्याचे यावेळी मार्गदर्शनातून स्पष्ट करण्यात आले.
विद्यार्थ्यांना व्यसनाचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम तसेच कौटुंबिक, शैक्षणिक आणि सामाजिक परिणाम समजावून सांगण्यात आले. निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्याची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचे विभागप्रमुख प्रेम आचार्य प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
मिलिंद जिल्हा व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने डॉ. सत्यम मुसळे, समुपदेशक सोनल घरत, दिया मोरे, श्रावणी पाटील, सरोज कवळे, साहिल घरत, आयुष चेरकर आणि आदित्य कराडे उपस्थित होते.
‘विद्यार्थीदशेतच व्यसनाला नकार; निरोगी पिढी घडविण्याचा निर्धार’ हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.