मटका-जुगार अड्ड्यांवर माणगांव पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; १४ जुगाऱ्यांवर गुन्हे, लाखोंचा मुद्देमाल जप्त!

Mangaon police conduct ‘surgical strike’ on Matka-gambling dens
माणगांव | नरेश पाटील 
माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या नेतृत्वाखाली माणगांव पोलिसांनी ४ व ५ ऑक्टोबर २०२६ रोजी निजामपूर टेकडी, निजामपूर गाव आणि माणगांव शहरातील खांदाड परिसरात मटका-जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण १४ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, ₹१,२४,८५५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
निजामपूर टेकडी परिसरात सहा, निजामपूर गावातील बाजारपेठ परिसरात चार, तर माणगांव शहरातील खांदाडमधील सिद्धीनगर परिसरात चार जणांवर कारवाई करण्यात आली. जुगार खेळणारे तसेच खेळविणारे आणि मटका खेळणारे व खेळविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि मोबाईल असा मुद्देमाल ताब्यात घेतला.
रविवारची सुट्टी असतानाही पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात सक्रिय राहून केलेल्या या कारवाईमुळे माणगांव तालुक्यातील मटका-जुगार व्यावसायिकांना मोठा धक्का बसला आहे. रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पीआय मारुती आंधळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईतून ‘सुट्टी असो वा कामाचा दिवस, कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई निश्चित’ असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.