रोहा तालुक्यातील बारसोली गावाच्या वळणावर टँकर मागे घेत असताना झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी (४ ऑक्टोबर) रात्री ही घटना घडली असून, याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त महितीनुसार, रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बारसोली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वळणावर आरोपी टँकरचालक सोहनलाल कानिया मीना (वय ३४, रा. डुंगारपूर, राजस्थान) हा RJ-58-GA-0141 क्रमांकाचा टँकर मागे घेत होता. यावेळी त्याने वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालविल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत अजय सुभाष सरकार या तरुणाचा मृत्यू झाला. अजय हा मूळचा पश्चिम बंगाल येथील असून, सध्या धाटाव, ता. रोहा येथे राहत होता.
अपघातानंतर चालकाने घटनास्थळी न थांबता अपघाताची माहिती न देता पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. नागरिकांच्या माहितीनुसार, दारूच्या नशेत रस्ता चुकल्याने टँकरचालक बारसोली गावाकडे गेला होता. तेथून टँकर मागे घेत असताना हा अपघात घडला. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार आशुतोष म्हात्रे करीत आहेत.