साडीचा दोरखंड बनवून  लॉकअपमधून दोन महिला आरोपी फरार

साडीचा दोरखंड बनवून  लॉकअपमधून दोन महिला आरोपी फरार
रायगड | अमुलकुमार जैन
नवी मुंबईतील नवी मुंबईच्या बेलापूर रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्यातून दोन महिला आरोपींनी साड्यांचा दोरखंड तयार करून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे आरपीएफच्या लॉकअप आणि सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पलायनाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
जुईनगर रेल्वेस्थानकातील गोदामातून ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर चोरी केल्याच्या आरोपाखाली आरपीएफने २६ सप्टेंबर रोजी जालन्याची रुपाली कुऱ्हाडे वय ३० वर्ष आणि भिवंडीची शालीबाई पवार वय ४० वर्ष यांना ताब्यात घेतले होते. २७ सप्टेंबर रोजी दोघींना सीएसएमटी येथील विशेष न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत आरपीएफ कोठडी सुनावण्यात आली होती.
२८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास दोघींनी लॉकअपमधून पळण्याची संधी साधली. त्यांनी गजांमधून हात बाहेर काढून लॉकअपचे कुलूप तोडले आणि दरवाजाची कडी उघडली. त्यानंतर ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या बाल्कनीत पोहोचून जनरेटरला साड्यांनी बनवलेले दोरखंड बांधली. साडीच्या दोरखंडाच्या मदतीने दोघी इमारतीवरून खाली उतरून पसार झाल्या.
त्यावेळी रात्रपाळीवरील महिला कर्मचारी काही वेळासाठी बाथरूमला गेल्याचे सांगण्यात येत आहे. ठाणे अंमलदाराच्या हा प्रकार लक्षात प्रकार आल्यानंतर पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. सकाळी पावणेनऊच्या सुमारास रुपाली कुऱ्हाडेला नेरुळ रेल्वेस्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. मात्र, शालीबाई पवार अद्याप फरार असून तिचा युद्धपातळीवर शोध सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलीस दल यांच्याकडून प्राप्त झाली आहे.