पेण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून आयोजित महिला कौशल्य विकास शिबिराचा आज नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना, “माझ्या शहरातील महिला वर्गाला सक्षम करणे हे आमचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडू,” असा निर्धार प्रितम पाटील यांनी व्यक्त केला. महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला व बालकल्याण सभापती कलावती पाटील यांनी मांडलेल्या प्रस्तावाला नगराध्यक्षा प्रितम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. आरी वर्क, फॅशन डिझाईन, कापडी व कागदी पिशव्या तयार करणे आदी कौशल्यांचे प्रशिक्षण महिलांना दिले जाणार आहे. जिजामाता आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या धाडसी महिलांमुळे महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली असून आज महिला शेतीच्या बांधापासून देशाच्या सीमेपर्यंत विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत, असेही प्रितम पाटील यांनी सांगितले.
घरातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच महिलांना फावल्या वेळेत व्यवसाय करता यावा आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आर्थिकदृष्ट्या सक्षम होता यावे, हा या प्रशिक्षणामागील उद्देश असल्याचे महिला व बालकल्याण सभापती कलावती पाटील यांनी सांगितले.
या शिबिरासाठी मोठ्या संख्येने महिलांनी नोंदणी केली असून आणखी इच्छुक महिलांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे. यंदाच्या आर्थिक अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण विभागासाठी भरघोस निधी उपलब्ध झाला असून त्याचा उपयोग महिलांच्या विकासासाठी केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका आदी उपस्थित होते.