रयत शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिर पोलादपूर शाळेमध्ये एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला ‘बॅड टच’ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शनिवारी १९ जुलै रोजी पीडित विद्यार्थिनीने आपल्या माता, पालक आणि समाजसेवकांसोबत शाळेच्या स्थानिक शाळा सभापतीकडे तक्रार केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या समाजसेवकाने संबंधित शिक्षकाच्या तोंडाला काळं फासून निषेध व्यक्त केला.
या घटनेनंतर मंगळवार, २२ जुलै रोजी शाळा व्यवस्थापन, पालक, विद्यार्थिनी, समाजसेवक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली. मनसेचे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी शिक्षकाच्या तात्काळ निलंबनाची मागणी करत मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी आमदार बाळाराम पाटील यांनी या प्रकरणात संबंधित शिक्षकाच्या निलंबनास मान्यता दिली आणि संस्थेच्यावतीने दिलगिरी व्यक्त केली.
विद्यामंदिर पोलादपूरमध्ये घडलेली घटना पोक्सो कायद्यानुसार गंभीर गुन्हा मानली जात असून, संबंधित शिक्षकावर कायदेशीर कारवाई होण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलादपूरमधील शैक्षणिक संस्थांमध्ये स्पर्धात्मक निकोप वातावरण राखण्याची गरज अधोरेखित होत असतानाच, अशा घटना रोखण्यासाठी शाळा प्रशासनासोबतच पोलिस प्रशासनाने देखील सक्रिय हस्तक्षेप करण्याची गरज आहे.