बालविवाहाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, रायगड (अलिबाग) यांच्याकडून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. “बालविवाह रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे” असा ठाम संदेश देत प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
बालविवाहामुळे मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होतो. शिक्षणाच्या संधी कमी होतात, आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात आणि कुपोषण तसेच बालमृत्यूचा धोका वाढतो. तसेच लहान वयात विवाह झाल्यास आर्थिक ओझे वाढण्यासोबतच कौटुंबिक हिंसाचार व शोषणाची शक्यता देखील वाढते. त्यामुळे “लहान वयातील मुलींसाठी वरमाला म्हणजे बेड्या” असे ठसवून सांगण्यात येत आहे.
याबाबत जनजागृती करताना अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी माहिती देताना सांगितले की, पालकांनी मुलांच्या संगोपनात अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. मुलांना योग्य शिक्षण देणे, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि बालविवाहासारख्या प्रथांना थांबवण्यासाठी समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे.
प्रशासनाने पालकांना विशेष सूचना दिल्या आहेत. मुलांच्या हातात मोबाईल देताना काळजी घ्यावी, मोबाईल वापरासाठी ठराविक वेळ ठरवावी, तसेच अभ्यास, खेळ आणि विश्रांती यामध्ये समतोल राखावा. मुलं काय पाहत आहेत आणि कोणाशी संवाद साधत आहेत यावर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. बंदी घालण्यापेक्षा मुलांशी संवाद साधणे अधिक प्रभावी ठरते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बालविवाहाबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी १०९८ (चाइल्डलाईन), १८१ (अभयम), १०९१ (महिला मदत), १०० व ११२ (पोलीस मदत), तसेच १५५२०९ (महाराष्ट्र राज्य महिला आयोग) हे क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी, तर ग्रामीण भागात ग्रामसेवक हे अधिकृत बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. “प्रशासन तुमच्या सोबत आहे, बालपण वाचवा,” असा संदेश देत नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.