अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी स्कूल व्हॅन चालकाविरोधात ‘POCSO’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे पालकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी व्हॅनने प्रवास करत होती. यावेळी संबंधित चालकाने (वय ५२, ता. अलिबाग) तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप आहे. घरी परतल्यानंतर विद्यार्थिनीने हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर घटना उघडकीस आली.
यानंतर संतप्त पालकांनी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता व ‘POCSO’ कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शाळा प्रशासन आणि वाहतूक व्यवस्थेवर कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.