वडखळ पोलीस ठाणे हे रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट व ‘स्मार्ट’ पोलीस स्टेशन म्हणून गौरवण्यात आले आहे. या ठाण्याने गेल्या काही काळात दाखवलेली जबाबदारीची जाण, प्रामाणिक कार्यशैली, परिसरातील स्वच्छता, व्यवस्थापनातील नेटकेपणा, तसेच अभिलेख व्यवस्थापनातील आधुनिकीकरणामुळे हे ठाणे इतरांसाठी एक प्रेरणास्थान बनले आहे.
विशेष म्हणजे, वडखळ पोलीस ठाणे हे ISO प्रमाणपत्र मिळवणारे जिल्ह्यातील अग्रगण्य पोलीस ठाण्यांपैकी एक ठरले आहे. हे प्रमाणपत्र कार्यप्रणाली, सेवांची गुणवत्ता व नागरिकांशी सौहार्दपूर्ण वागणूक यावर आधारित दिले जाते.
शनिवार, दिनांक 19 एप्रिल रोजी, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते हा गौरव प्रदान करण्यात आला. वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी हे दोन्ही प्रमाणपत्र सन्मानपूर्वक स्वीकारले.
पोलीस अधीक्षकांनी वडखळ ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “या ठिकाणच्या पोलीस दलाने नागरिकाभिमुख सेवा देत पोलीस प्रशासनाचे प्रतिमान उंचावले आहे. हा आदर्श इतर पोलीस ठाण्यांनीही स्वीकारावा.”
या सन्मानामुळे वडखळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी वर्ग अधिक प्रेरित झाले असून, त्यांनी नागरिकांची सेवा अधिक उत्कृष्टतेने करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.