राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई या जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी गंभीर हवामान इशारा जारी केला आहे. विशेषतः २८ आणि २९ सप्टेंबरला अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असून प्रशासन व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी या चारही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जोरदार ते अति जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या, २८ सप्टेंबर रोजी परिस्थिती अधिक गंभीर होणार असून रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई या सर्व जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. २९ सप्टेंबरला पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट तर रायगड, ठाणे आणि मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी या सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार किनारपट्टीवरील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याच्या सूचना पाळाव्यात तसेच प्रशासकीय यंत्रणांनी पूर व आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.