पोलादपूरमध्ये रिव्हर राफ्टींगचा शुभारंभ – पर्यटन व रोजगार विकासाला चालना

पोलादपूरमध्ये रिव्हर राफ्टींगचा शुभारंभ – पर्यटन व रोजगार विकासाला चालना
पोलादपूर (शैलेश पालकर) : 
पोलादपूरच्या डोंगरदरीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला निसर्गसंपन्नतेची जोड असून या दूर्गम डोंगराळ तालुक्यात पर्यटन विकासाला तसेच व्यवसायांना युवावर्गाच्या मदतीने मंत्री ना.गोगावले आणि राज्यसरकारमार्फत चालना देण्यात येईल, अशी ग्वाही शिवसेनेच्या युवा सेना कोअर कमिटीचे सदस्य विकास गोगावले यांनी दिली.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे येथील धरणालगतच्या पुलालगत नरवीर ऍडव्हेंचर्स ऍण्ड स्पोर्टसचे उद्योजक रामदास कळंबे यांच्या रिव्हर राफ्टींगच्या या साहसी खेळाचा शुभारंभ विकास गोगावले यांच्याहस्ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी विकास गोगावले बोलत होते.
याप्रसंगी तहसिलदार कपिल घोरपडे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, नगरसेवक सिध्देश शेठ, दत्ता मोरे, शहरप्रमुख सुरेश पवार, शैलेश उतेकर, कोलाड येथील रिव्हर राफ्टींग उपक्रमाचे हरिश सानप आणि सहकारी तसेच पोलादपूरचे नरवीर ऍडव्हेंचर्सचे सदस्य तरूण उपस्थित होते.
यावेळी रिव्हर राफ्टींगच्या वॉटरबोटचा शुभारंभ विकास गोगावले यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून तसेच पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. याप्रसंगी विकास गोगावले यांनी, घागरकोंडच्या झुलत्या पुलापासून पोलादपूर तालुक्यातील कोणते पर्यटन स्थळ विकासित करून तरूणांसाठी रोजगार निर्मिती करण्याची भूमिका पुढे आली तर त्याकामी अवश्य सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी रामदास कळंबे यांनी गेल्या तीन वर्षांपासून रिव्हर राफ्टींगसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना विकास गोगावले यांनी पाठिशी उभे राहून सहकार्याचा हात दिल्यामुळेच हे स्वप्न पूर्णत्वास गेल्याचे यावेळी सांगितले. याप्रसंगी तहसिलदार घोरपडे तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद साने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *