शहर असो वा जिल्ह्याचा ग्रामीण भाग, अल्पवयीन व कॉलेजवयीन मुलींवर होणारे पाठलाग, विनयभंग आणि लैंगिक अत्याचार यामध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून समाजात भीतीचे वातावरण आहे.
जिल्हा पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ ते मे २०२५ या १७ महिन्यांत रायगड जिल्ह्यात महिला संबंधित 370 गुन्हे नोंद झाले आहेत. यामध्ये 233 विनयभंग आणि 137 बलात्काराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. याचा अर्थ दरमहा सरासरी 25 महिला अत्याचाराचे बळी ठरत आहेत.
देशभर गाजलेल्या कोपर्डी घटनेनंतरही अशा घटनांमध्ये घट होण्याऐवजी वाढच होताना दिसत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक, महिला दक्षता पथक, दामिनी पथक असे विविध उपक्रम पोलीस यंत्रणेद्वारे राबवले जात असले तरी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
सोशल मीडियावरून वाढते सायबर गुन्हे: गेल्या दीड वर्षांत फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावरून विनयभंग आणि धमक्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा पीडित मुलींना आकर्षणाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे केले जात असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
या गुन्ह्यांमध्ये गर्भधारणा, शारीरिक अत्याचार, अपहरण यांचाही समावेश आहे. विशेषतः सोशल मीडियावरील ओळखीतून जवळीक निर्माण होऊन त्या मुली फसवल्या जात असल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने आल्या आहेत.
कायद्यातील तरतुदी: विनयभंग हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून, सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. तसेच सुधारित कायद्यानुसार फास्ट ट्रॅक कोर्टात अशा प्रकरणांवर खटले चालवणे आवश्यक आहे, जेणेकरून आरोपींना लवकर शिक्षा होऊन समाजात एक मजबूत संदेश जाईल.
मात्र… यामध्ये काही घटनांमध्ये खोटे आरोपही समोर आले आहेत. आकस, सूड किंवा दबावामुळे विनयभंगाच्या खोट्या तक्रारी केल्या गेल्याचे उदाहरणही पोलिस नोंदवत आहेत. त्यामुळे न्यायप्रणाली आणि तपास यंत्रणांसमोर सत्य शोधण्याचे मोठे आव्हान उभे आहे.
📢 सामाजिक जबाबदारी: सामाजिक संस्थांनी व पोलिसांनी मिळून गावपातळीवर जनजागृती वाढवणे गरजेचे आहे. महिला आणि मुली सुरक्षित राहाव्यात, त्यांना घरात व समाजात आदर मिळावा, यासाठी सर्व स्तरांवर ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे.
—————————-
“विनयभंग, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथके, महिला पथकेदेखील कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे अल्पवयीन मुली यांना शरीर स्पर्श तसेच काही व्हिडिओ क्लिप च्या माध्यमातून योग्य ती माहिती देण्यात येईल जेणेकरून मुलींना सुद्धा स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि कोणापासून दूर रहावे याची माहिती होईल.
…आंचल दलाल. पोलिस अधीक्षक. रायगड अलिबाग.
———————————————————————— महिना/ विनयभंग/ बलात्कार ———————————————————————— जानेवारी २०२४/१३/०५ फेब्रुवारी २०२४/०९/०७ मार्च २०२४/१४/०८ एप्रिल२०२४/१५/०६ मे २०२४/१८/०६ जून २०२४/१०/०७ जुलै २०२४/०९/१० ऑगस्ट २०२४/१६/१० सप्टेंबर २०२४/१२/१२ ऑक्टोबर २०२४/१८/१२ नोव्हेंबर२०२४/११/०६ डिसेंबर २०२४/१०/१२ ———————————————————————- एकूण/१५५/१०१ ———————————————————————- जानेवारी २०२५/१७/०५ फेब्रुवारी २०२५/१३/०४ मार्च २०२५/१६/११ एप्रिल२०२५/१७/०८ मे २०२५/१५/०८ ———————————————————————- एकूण/७८/३६