रायगड जिल्हा परिषद शाळांतील स्वयंपाकींचे पाच महिन्यांचे मानधन थकले

Five months' honorarium for cooks in Raigad Zilla Parishad schools remains unpaid
रायगड | अमुलकुमार जैन 
एकीकडे राज्य शासन शाळांमधील शालेय पोषण आहार योजनेत दररोज नवनवीन पदार्थ समाविष्ट करून विविध प्रयोग करत असल्याचे भासवत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत भीषण असल्याचे समोर आले आहे. रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांसाठी कष्टपूर्वक भोजन शिजवणाऱ्या स्वयंपाकी महिलांना शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून म्हणजे जून महिन्यापासून तब्बल पाच महिन्यांचे मानधन मिळालेले नाही.
 जेमतेम अडीच हजार रुपये महिन्याच्या अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या या महिलांची गैरसोय होत आहे. परिणामी शिक्षकांसह स्वयंपाकी महिलांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
 या गंभीर समस्येबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शाखा सुधागड) व सुधागड तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती पाली यांना गुरुवारी (ता. 15) निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, थकीत मानधनामुळे स्वयंपाकी महिलांनी अन्न शिजवण्यास नकार दिला आहे. तसेच तालुक्यातील शाळांमध्ये पोषण आहाराचा साठा संपला असून प्रशासनाने तातडीने यावर योग्य मार्ग न काढल्यास शालेय पोषण आहार शिजवणे पूर्णपणे बंद होईल, असा इशाराही देण्यात आला आहे. शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मुलांच्या आरोग्याशी व स्वयंपाकी महिलांच्या हक्काशी खेळ सुरू असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
 याबाबत पेण तालुक्यातील सरिता गजानन पवार यांनी सांगितले की, पती मोलमजुरी करतात शिवाय पोटापाण्यासाठी इतर जिल्ह्यांमध्ये व राज्यात स्थलांतर होऊ नये यासाठी शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करत आहे. पण मानधन मिळत नसल्यामुळे घर खर्च कसा चालवायचा त्याची चिंता पडली आहे.  
 अनेक ठिकाणी केवळ विद्यार्थ्यांच्या तोंडी चार घास जावेत आणि लहान मुलांची सोय व्हावी या संवेदनशील भावनेपोटी स्वयंपाकी महिला तोंड दाबून काम करत आहेत; मात्र पोटापाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिल्याने त्या हतबल झाल्या आहेत.
——————————————
 शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त शाळाबाह्य कामे करावी लागतात. त्यातच आता स्वयंपाकी महिलांचे मानधन आलेले नाही. दोन महिन्यांपासून धान्य व डाळी देखील उपलब्ध नाहीत. तसेच इंधन व भाजीपाला मानधन देखील वेळेवर मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहार कसा उपलब्ध करून द्यायचा याबाबत चिंता असल्याने संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिले आहे. भाजीपाला व इंधन स्वखर्चाने आणतो. 
मोरेश्वर कांबळे, जिप शिक्षक, सुधागड 
——————————————
 स्नॅप स्पर्श (SNAP SPARSH) प्रणाली मार्फत थेट स्वयंपाकीच्या बँक खात्यात मानधन जमा करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक वेळा त्यांच्या बँक खात्याची माहिती मागितली जाते. आमच्याकडून तात्काळ माहिती दिली ही जाते. मात्र अद्याप मानधन जमा झालेले नाही. त्यामुळे स्वयंपाकी महिलांना टीकवून ठेवण्यासाठी पदरमोड करावी लागते. या प्रकारामुळे शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक प्रचंड मानसिक ताणाखाली आले आहेत.
मोहन भोईर, जिप शिक्षक, पेण 
——————————————
 जिल्हा परिषदे कडून संबंधित महिला स्वयंपाकी यांना मानधन दिले जात नाही, ते राज्य शासनाकडून दिले जाते याबाबत तेथून माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. 
नेहा भोसले, मुख्याधिकारी, जिल्हा परिषद रायगड