कर्जत तालुक्यातील चाफेवाडी-गावंडवाडी परिसरातील आदिवासी आणि वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षतोड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते मनोहर कारोटे यांनी दिलेल्या माहितीनंतर वनविभागाने कारवाई करत दोन स्वतंत्र प्रकरणांत तब्बल ३३९ सागवान बुडांची नोंद केली असून, तोडण्यात आलेले लाकूडही जप्त केले आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होईपर्यंत वनविभागाच्या नियमित गस्तीला याची भनक लागली नव्हती का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
चाफेवाडी-गावंडवाडी परिसरात झालेल्या सागवान वृक्षतोडीप्रकरणी वनविभागाने दोन स्वतंत्र प्रकरणांत कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेले लाकूड पोई येथील शासकीय वनडेपोत जमा करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते मनोहर कारोटे यांनी या प्रकरणाची माहिती वनविभागाला दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल नेमकी कोणी केली? या वृक्षतोडीमागे लाकूड व्यापाऱ्यांचे काही व्यवहार होते का? तसेच, केवळ लाकूड जप्त करून कारवाई थांबणार की प्रत्यक्ष वृक्षतोड करणारे आणि त्यामागील संबंधित व्यक्तींपर्यंत वनविभागाचा तपास पोहोचणार, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आदिवासी खातेदारांनी वृक्षांचा व्यवहार करताना संबंधितांशी लेखी करार करावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे. मात्र, या परिसरात नियमित गस्त घातली जात असताना इतक्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड वेळेत निदर्शनास का आली नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे जप्तीच्या कारवाईसोबतच वृक्षतोडीची व्याप्ती, त्यामागील कारणे आणि जबाबदार व्यक्तींचा शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
३३९ सागवान बुडांची नोंद आणि तोडलेल्या लाकडांची जप्ती झाली असली, तरी या कारवाईतून वृक्षतोडीचे संपूर्ण जाळे उघड होणार का? आणि वनसंपत्तीच्या रक्षणासाठी जबाबदार असलेल्या यंत्रणेच्या गस्तीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.