रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथे महाडिक भावकीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र उत्सव जागर कुलस्वामिनी मातेचा या कार्यक्रमात लोककलेची अभूतपूर्व पर्वणी उपस्तिनां पहायला मिळाली.महाराष्ट्राची भारुड परंपरा लोकधारा,शाहिरी परंपरा आणि पारंपरिक नमनाचा वारसा जपत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात लोककलेचे प्रसिद्ध शाहिर रत्नाकर महाकाल खेड रत्नागिरी यांच्या बहारदार सादरीकरणाने महाडिक परिवार चिल्हे ग्रामस्थांसह उपस्थित रसिक प्रेक्षक पूर्णपणे मंत्रमुग्ध झाले होते. कुलदैवत आणि कुलाचाराला वंदन करून सुरू झालेला हा सोहळा संपेपर्यंत रसिकांना खिळवून ठेवण्यात कलाकारांच्या भूमिकेतून कमालीचा यशस्वी ठरला.
गण-गवळण पदांनी तसेच हिंदू संस्कृतीच्या आधारे आणि तरुणांना प्रेरणादाई ठरणारे हास्य कला वगनाट्य यांनी रंगली नमन रात्री कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने रंगमंचावर महाडिक परिवारातील प्रमुख पदाधिकारी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून गण आणि गवळणीने झाली. शाहिर रत्नाकर महाकाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकापेक्षा एक सरस पदे, गण आणि गवळणी सादर करत कार्यक्रमात मोठी रंगत आणली. शाहिर महाकाल यांच्या खड्या आणि पहाडी आवाजाने चिल्हे पंचक्रोशीतील वातावरण अक्षरशः भारावून गेले होते. ढोलकीची थाप, टाळांचा गजर आणि विविध यंत्रणा शाहिरांची सुबक जुगलबंदी यांमुळे सादरीकरणात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, आणि कलियुग या साऱ्या उपस्थित रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना भरभरून दाद दिली.
वगनाट्याने जिंकली रसिकांची मने नमन आणि शाहिरी गाण्यांनंतर सादर झालेल्या वगनाट्याने तर कार्यक्रमात मोठी रंगत आणली. दर्जेदार अभिनय, अचूक संवादफेक आणि सोबतीला असलेला सामाजिक संदेश यांमुळे वगनाट्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कुलदैवत आणि कुलाचाराचा हा पारंपरिक जागर केवळ मनोरंजन न ठरता संस्कृतीचे दर्शन घडवणारा ठरला.
चिल्हे येथील महाडिक भावकीच्या सहकार्यातून कुलदैवताचा जागर नवरात्रो उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी १३ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचे भव्य दिव्य सुरुपात आयोजन करण्यात आले होते.महाडिक भावकीचा कौतुकास्पद उपक्रम चिल्हे गावातील महाडिक भावकीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाचे अत्यंत नेटके आणि भव्य आयोजन करण्यात आले होते. आपली संस्कृती आणि लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने या नमन व शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील शेकडो रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
शाहिर रत्नाकर महाकाल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या अद्भुत सादरीकरणाने या उत्सवाची शोभा वाढवली तसेच देव देवतांचा युग रामायण,महाभारत, छत्रपती शिवराय यांचे बालपण आणि राज्याभिषेक सोहळा अखंड हिंदूंचे रक्षक शंभूराजे यांच्या इतिहासाची आठवण या कार्यक्रमातून करत गावदेवी माता आई चिल्लाई माता या देवीच्या नावाने देखील एक गीत गायन करून असंखे ग्रामस्थ महिला युवक युवतींची मने जिंकली आणि परिसरातील रसिकांना लोककलेचा खरा आनंद घेता आला,अशा भावना महाडिक भावकीच्या प्रमुख सदस्यांनी व ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. चिल्हे गावात पार पडलेला हा लोककलेचा जागर दीर्घकाळ रसिकांच्या स्मरणात राहील, यात शंका नाही.