महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोकाभिमुख ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता माणगाव येथील प्रशासकीय भवनात मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास व पालकमंत्री ना. भरतशेठ गोगावले, तसेच महिला व बालविकास मंत्री ना. कु. आदितीताई तटकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासन विभागाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये खरीप हंगाम २०२६ साठी ‘ट्रिगर-१’ अंतर्गत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
शासनाच्या या महत्त्वपूर्ण अभियानाची माहिती आणि वृत्त सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल्स आणि डिजिटल माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यातील सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकार बंधू-भगिनींनी गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता माणगाव तहसील कार्यालयातील प्रशासकीय भवन येथे उपस्थित राहून कार्यक्रमाचे वृत्तांकन करावे आणि अभियानाला व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन माणगावचे तहसीलदार विपीन लोकरे यांनी केले आहे.
शासकीय योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमधील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे.