‘एकच फाईट, वातावरण टाईट’; बचाव समितीच्या इशाऱ्यानंतर श्रीराम पुलाची दुरुस्ती सुरू

कर्जत-ग्रामीण | मोतीराम पादीर 
कर्जत शहरातील नवीन श्रीराम पुलावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर अखेर कर्जत शहर बचाव समितीच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम दिसू लागला आहे. पुलावरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देत समितीने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यामुळे समितीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग आली का, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.
पावसाळ्यापूर्वी उद्घाटन झालेल्या या पुलावर अवघ्या दोन ते तीन महिन्यांत खड्डे पडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असतानाही दुरुस्तीला विलंब होत असल्याने समितीने आक्रमक पवित्रा घेतला. बुधवारी ता.14 ऑक्टोबर रोजी बचाव समितीने तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन देऊन आठ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास दिवाळीपूर्वी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
निवेदन देण्याच्या पार्श्वभूमीवरच पुलावरील दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने समितीच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेतली जात असल्याचे चित्र आहे. यावेळी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अनिकेत साळुंखे यांनी पुलावरील काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. पुढील महिनाभरात खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याचे आश्वासन देण्यात आले असून, दुरुस्तीच्या काळात पुलाचा निम्मा भाग बंद ठेवून काम केले जाणार आहे.
दरम्यान, केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार आणि टिकाऊ दुरुस्ती करावी, अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे. काही दिवसांत पुन्हा खड्डे पडून नागरिकांना त्रास होणार असेल, तर अशा कामाचा उपयोग काय, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. पुलाजवळील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण आणि ट्रान्सफॉर्मर हटविण्यासह कर्जत शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्व संबंधित विभागांची समन्वय बैठक घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“एकच फाईट, वातावरण टाईट!” या आक्रमक भूमिकेतून बचाव समितीने प्रशासनाला दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष देण्यास भाग पाडल्याचे चित्र आहे. आता काम सुरू झाले असले, तरी ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होते का, याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.