उरणमध्ये बंटी-बबलीचा धुमाकूळ; घरफोड्यांचे मोठे रॅकेट उघड !

'Bunty-Babli' duo on a spree in Uran
रायगड | अमुलकुमार जैन
उरणमधील अनेक परिसरात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या एका जोडगोळीसह ४ आरोपींना उरण पोलिसांनी अटक केली आहे. घरातून टीव्ही चोरीला गेल्याच्या तक्रारीचा तपास करताना पोलिसांनी घरफोडीची मोठी मालिकाच उघडकीस आणली आहे. या प्रकरणातील चारही आरोपींविरोधात विविध पोलीस ठाण्यांत मिळून ३५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.
या कारवाईमुळे उरण परिसरातील घरफोडीच्या घटनांबाबत महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरातून टीव्ही चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी विशेष पथक तयार करून चोरट्यांचा शोध सुरू केला. परिसरातील संशयास्पद हालचालींची माहिती गोळा करत तांत्रिक तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता अनेक घरफोड्यांशी त्यांचा संबंध असल्याचे तपासात उघड झाले.
या प्रकरणातील मोहित कोळी आणि त्याची मैत्रीण स्वप्नाली उर्फ सोनू पाटील या दोघांनी उरण तसेच आसपासच्या परिसरात अनेक घरफोड्या केल्याचे तपासातून निष्पन्न झाल्याची माहिती आहे. या दोघांच्या नावावर तब्बल २८ घरफोड्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे. तर अन्य एका आरोपीचा सहा घरफोड्यांमध्ये आणि चौथ्या आरोपीचा एका घरफोडीच्या प्रकरणात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे एका साध्या चोरीच्या तक्रारीतून घरफोड्यांच्या मोठ्या रॅकेटचा तपास पुढे आला आहे.
पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी आणखी किती गुन्हे केले आहेत, चोरीचा मुद्देमाल कुठे विकला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास उरण पोलीस करत आहेत.
दरम्यान, या कारवाईमुळे उरण परिसरातील घरफोडीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी घराबाहेर जाताना घरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.