माथेरानमध्ये तब्बल ५२ कोटी रुपयांच्या निधीतून प्रस्तावित करण्यात आलेल्या पाच एसटीपी प्रकल्पांवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वखारी नाका आणि वीर हुतात्मा भाई कोतवाल नगर येथील एसटीपी प्लांट दोन महिन्यांत सुरू करण्याचे आश्वासन देऊन चार महिने उलटले, तरी प्रत्यक्षात काम सुरू झाले नसल्याचा आरोप शिवराष्ट्र पॅनलचे विरोधी पक्षनेते सिताराम कुंभार, नगरसेवक सचिन दाभेकर, किरण पेमारे, नगरसेविका अनिता रांजणे, अनुसया ढेबे यांनी केलेली पाहणीनुसार समोर येत आहे.
माथेरान नगरपरिषद आणि ह्यूमन राइट्स समितीच्या माध्यमातून प्रस्तावित पाच एसटीपी प्रकल्पांपैकी काहींची कामे गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहेत. मात्र, प्रकल्पांच्या जागा, ड्रेनेजची दिशा आणि कामाच्या दर्जावरून शिवराष्ट्र पॅनलचे विरोधी पक्षनेते व नगरसेवकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत.
११ जूनच्या बैठकीत तांत्रिक अधिकाऱ्यांनी वखारी नाका आणि वीर हुतात्मा भाई कोतवाल नगर येथील प्लांट दोन महिन्यांत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र चार महिने उलटूनही हे आश्वासन पूर्ण झाले नसल्याचा दावा हा विरोधी पक्षनेते कुंभार व दाभेकर यांनी केला आहे. दरम्यान,शिवराष्ट्र पॅनलचे विरोधी पक्षनेते कुंभार, दाभेकर यांनी प्लांटच्या कामांची पाहणी करत कामाचा दर्जा आणि वापरण्यात आलेल्या साहित्याबाबतही प्रश्न उपस्थित केले.
आता प्रश्न एकच – माथेरानकरांना यंदा एसटीपी प्रकल्पाचे दिवाळी गिफ्ट मिळणार का? की आश्वासनांच्या फेऱ्यात हा प्रकल्प पुन्हा अडकणार? की कागदावर राहाणार का? असे अनेक सवाल मात्र करदात्या माथेरानकरांच्या वत्तीने विरोधी नगरसेवक म्हणून उपस्थित केला जात आहे.
आता मात्र ह्यूमन राइट्स समितीच्या माध्यमातून ४८ कोटी व माथेरान नगरपरिषद मिळून साधारण ५२ कोटीच्या निधीच्या माध्यमातून माथेरानमध्ये एकूण प्रस्तावित पाच प्लांटच्या ठेकेदार व संबंधित जबाबदार प्रशासनाचे अधिकारी वर्ग यांच्या स्तरावरून देण्यात आलेल्या आश्वासन व कार्यवाही तसेच सत्ताधारी नगरसेवकांच्या भूमिकेकडे मात्र विरोधी नगरसेवकांसह करदात्या माथेरानकरांचे लक्ष लागले आहे.