रायगडमधील मुस्लिम, जैन व बौद्ध समाजासाठी ५० कोटींच्या विकासकामांना केंद्राची तत्वत: मंजुरी

#Dharyashil patil
अलिबाग | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील मुस्लिम, जैन आणि बौद्ध समाजासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेत सुमारे ५० कोटी रुपयांच्या ५५ विकासकामांना तत्वत: मंजुरी दिली आहे. राज्यसभा खासदार व भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष मा. धैर्यशील पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अल्पसंख्यांक विकासासाठी केंद्राकडून हिरवा कंदील मिळाला आहे.
केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री मा. ना. किरेन रिजीजू यांची खासदार धैर्यशील पाटील व भाजप जिल्हा महामंत्री सतीश धारप यांनी संसदेतील मंत्री दालनात भेट घेतली. या भेटीत रायगड जिल्ह्यातील मुस्लिम, जैन व बौद्ध समाजासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रलंबित विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर अलिबाग येथे मुस्लिम समाजासाठी ३ कोटींचे सामाजिक संकुल, तर अलिबाग, पेण, पनवेल आणि महाड येथे प्रत्येकी ३ कोटी रुपयांची जैन समाजासाठी सामाजिक संकुले उभारण्यास तत्वत: मंजुरी देण्यात आली.
याशिवाय महाड तालुक्यात बौद्ध समाजासाठी १० कोटी रुपयांचे भव्य सामाजिक संकुल, पाली शहरात मुस्लिम समाजासाठी १ कोटी रुपयांचे शादीखाना तसेच श्रीवर्धन तालुक्यातील हरवीत गावात मुस्लिम सामाजिक संकुल उभारण्यालाही मान्यता मिळाली आहे. एकूण ५५ विकासकामांसाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *