अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अपंगत्व दाखला प्रक्रियेत गंभीर अनियमितता; दिव्यांगांचा मानसिक व शारीरिक छळ

#Serious irregularities in the disability certificate process at Alibaug Civil Hospital
अलिबाग | अमुलकुमार जैन 
अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अपंगत्व दाखला प्रक्रियेत गंभीर अनियमितता आणि अपारदर्शकता उघडकीस आली आहे. बुधवार रोजी अपंग नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही, बसण्याची आणि प्राथमिक सोयींची व्यवस्था अगदी अपुरी असल्याचे दृश्य समोर आले. परिणामी नागरिकांना तासनतास उभे राहावे लागले, ज्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला.
एक-दोन अधिकारी अपंगांशी संवेदनशीलतेने वागले, तरीही अनेक अधिकारी आणि कर्मचारी उद्धट व असंवेदनशील होते, अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे. विशेषतः वैद्यकीय अधिकारी कदम यांनी अपंग नागरिकांशी संवाद साधताना अरेरावीची भाषा वापरल्याचे देखील अपंग बांधवांनी नमूद केले.
याचबरोबर, जुने अपंगत्व दाखले असलेल्या नागरिकांनाही जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे पुन्हा तपासणीस पाठवले जात आहेत. काही अपंग नागरिकांना आधी ५०% किंवा ४०% अपंगत्वाची मान्यता दिली होती, ती आता अचानक २५% करण्यात येत असल्याचा आरोप आहे. वैद्यकीय दृष्टिकोनातून वय वाढल्याने अपंगत्व अधिक तीव्र होणे नैसर्गिक आहे; मात्र प्रशासनाद्वारे टक्केवारी कमी करणे हा अन्यायकारक प्रकार आहे.
संपूर्ण प्रक्रियेत अपारदर्शकता, मनमानी व संवेदनाहीनता स्पष्टपणे जाणवत असून, अपंग बांधवांचा छळ सुरू असल्याचा गंभीर निष्कर्ष लागू शकतो. अपंगत्व ही सामाजिक वास्तव असून, त्यावर आधारित यंत्रणा मानवीय दृष्टिकोनातून आणि संवेदनशीलतेने चालली पाहिजे.
विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, अपंग नागरिकांसाठी मूलभूत सुविधा, वेळेवर दाखले, पर्याप्त डॉक्टर, बसण्याची सोय आणि मानवीय वागणूक या सर्व गोष्टी तातडीने सुनिश्चित करणे आवश्यक आहे. अन्यथा “दिव्यांग” हा शब्द फक्त कागदावर राहील, आणि प्रत्यक्षात अपंगत्वाचा अपमान सुरु राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *