कुर्डूसच्या कु. श्रेया पिंगळेची राष्ट्रीय थांग-ता चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र संघात निवड

#Shreya pingale

अलिबाग | प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील कुर्डूस येथील विभागीय स्पोर्ट्स क्लब – जय शोतोकन कराटे अकॅडमीची खेळाडू व पी. एन. पी. स्कूलची विद्यार्थिनी कु. श्रेया पुरुषोत्तम पिंगळे हिची आसाम-गुवाहाटी येथे २२ ते २४ डिसेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या ३१ व्या ज्युनिअर राष्ट्रीय थांग-ता चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र राज्य थांग-ता संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे कुर्डूससह संपूर्ण रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलिबाग येथे झालेल्या जिल्हास्तरीय तसेच २० ते २२ सप्टेंबर २०२५ रोजी अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय थांग-ता क्रीडा स्पर्धेत श्रेयाने सुवर्णपदक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली. या यशाच्या जोरावर तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, १६ ते १८ डिसेंबर दरम्यान वडूज, सातारा येथे आयोजित स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्र संघासोबत तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिने सराव केला. या राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी कामगिरी करण्याचा निर्धार श्रेयाने व्यक्त केला आहे.
याशिवाय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत झालेल्या तालुका व जिल्हास्तरीय १७ वर्ष वयोगट कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत तिने ठाणे येथील शालेय मुंबई विभागीय कराटे स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. तसेच मुरुड येथे मास-रेसलिंग असोसिएशनतर्फे झालेल्या स्पर्धेत तिने अंतिम विजेतेपद पटकावले. प्रशिक्षक संतोष कवळेसर यांचे मार्गदर्शन, पी. एन. पी. स्कूलच्या मुख्याध्यापिका मेधा दुबे, शिक्षकवृंद तसेच पालक विद्या व पुरुषोत्तम पिंगळे यांच्या प्रोत्साहनामुळे श्रेयाने तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर सुवर्णमय यश मिळवत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *