रायगड जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांच्याविरोधात आलेल्या तक्रारींवर अखेर शासनाने निर्णायक पाऊल उचलले आहे. प्राथमिक चौकशीत गंभीर अनियमितता आढळल्याने डॉ. विखे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या विरोधात शिस्तभंगविषयक चौकशी सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने हा आदेश महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४(१)(अ) नुसार जारी केला आहे. हा आदेश राज्यपालांच्या नावे व आदेशानुसार कार्यासन अधिकारी प्रे. ज्ञा. सोनटक्के यांनी प्रसिद्ध केला आहे. डॉ. विखे यांच्या कार्यप्रणालीबाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने झालेल्या प्राथमिक चौकशीत अनेक गंभीर निरीक्षणे नोंदवली गेली. या अहवालाच्या आधारे शासनाने चौकशीपर्यंत त्यांना निलंबनात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
निलंबनाच्या काळात डॉ. विखे यांचे मुख्यालय उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे येथे राहील. त्या सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू शकणार नाहीत. तसेच त्यांनी कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करू नये, अशी कठोर अट आदेशात नमूद आहे. या अटीचे उल्लंघन केल्यास ते गैरवर्तन समजले जाईल आणि त्यांचा निर्वाहभत्ता रद्द केला जाईल.
या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यातील आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. विखे यांच्या कार्यकाळातील काही प्रशासनिक निर्णयांवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. आता शासनस्तरावर सुरू होणाऱ्या चौकशीत त्या तक्रारींचा तपशील समोर येण्याची शक्यता असून, चौकशीचा निकाल डॉ. विखे यांच्या सेवाभविष्यावर निर्णायक ठरणार आहे.