मोंथा चक्रीवादळाचा उरण मच्छीमारांना मोठा फटका : आमदार महेश बालदींचा दिलासा दौरा

मोंथा चक्रीवादळाचा उरण मच्छीमारांना मोठा फटका
उरण | विठ्ठल ममताबादे 

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळामुळे उरण तालुक्यातील मच्छीमारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सुदैवाने सर्व बोटीवरील खलाशी सुखरूप परतले असले तरी मच्छीमारी व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेश बालदी यांनी करंजा बंदरावर कोळी बांधवांशी संवाद साधत त्यांना धीर दिला तसेच नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उरण तालुक्यातील सात मच्छीमारी बोटींचा संपर्क तुटल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र बुधवारी या सर्व बोटी व खलाशांशी संपर्क साधण्यात यश आले असून सर्व जण सुखरूप असल्याची माहिती आमदार बालदी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, खोल समुद्रातून परत आलेल्या बोटींना दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

राज्य सरकारने नुकताच मत्स्यव्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा दिल्याने, आता मच्छीमारांनाही नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे. या धोरणाच्या आधारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांच्याकडे अहवाल सादर करून तातडीने मदत मिळवून देणार असल्याचे आमदार महेश बालदी यांनी स्पष्ट केले.

या वेळी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रदीप नाखवा, राजेश नाखवा, भारत नाखवा, रमेश नाखवा, जयविन कोळी, नारायण नाखवा, उमेश भगत, महेंद्र कोळी, ऋषिराज कोळी, राजेंद्र नाखवा यांसह मच्छीमार व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *