राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे व तत्सम आस्थापनांना ही सुट्टी लागू राहणार आहे. तसेच मतदान क्षेत्राबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू असेल. महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका व निमशासकीय कार्यालयांनाही ही सुट्टी बंधनकारक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर अशा एकूण २९ महानगरपालिकांचा समावेश आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.