मुरूड नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल हा स्पष्ट बदल दर्शवणारा ठरला आहे. माजी नगराध्यक्षा कल्पना संदीप पाटील यांना नाकारत जनतेने माजी नगराध्यक्षांच्या कन्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आराधना मंगेश दांडेकर यांना पसंती दिली. २४६ मतांच्या फरकाने मिळालेल्या या विजयामुळे मुरूडच्या राजकारणात नवे सत्तासमीकरण निर्माण झाले असून शिंदे गटाला ही चांगलीच चपराक मानली जात आहे.
आराधना दांडेकर यांना ४,१९४ मते मिळाली, तर शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार कल्पना पाटील यांना ३,९४९ मतांवर समाधान मानावे लागले. ही निवडणूक शेवटपर्यंत चुरशीची राहिली असली, तरी निकालाने जनतेचा कल बदलाकडे असल्याचे स्पष्ट केले. माजी नगराध्यक्षा असूनही पराभव पत्करावा लागल्याने शिंदे गटाच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या निकालानंतर मुरूड शहरासह संपूर्ण तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. थेट नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्याने शिवसेनेच्या ताब्यात असलेली नगरपरिषद आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाच्या प्रभावाखाली आली आहे. नगरसेवक निवडणुकीत शिवसेनेचे १२ नगरसेवक निवडून आले असले, तरी राष्ट्रवादीचे ४ आणि उबाठा गटाचे ४ नगरसेवक यांच्यामुळे सत्तेची किल्ली राष्ट्रवादी-उबाठा आघाडीच्या हातात गेली आहे.
या निकालाचा सर्वाधिक फटका शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना बसल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तीन नगरपालिकांपैकी एकही नगरपालिका आपल्या गटाकडे राखण्यात ते अपयशी ठरले आहेत. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाचा उमेदवारही निवडून न आल्याने “पाणी नेमके कुठे मुरले?” याचा शोध घेण्यासाठी आमदार दळवी यांना आत्मपरीक्षण करावे लागणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, नवनिर्वाचित नगराध्यक्ष आराधना दांडेकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य देणार असल्याचे संकेत दिले असून पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख निर्णय घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या विजयामुळे मुरूडच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीकडे जनतेचे लक्ष लागून राहणार आहे.