मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंता श्रद्धा दिलीप बो-हाडे (वय २९) यांना २ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अॅन्टी करप्शन ब्युरो (ACB) रायगड पथकाने रंगेहाथ पकडले. “कामासाठी लाच” या प्रकारामुळे मुरुड तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, शासकीय यंत्रणेमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ठेकेदाराने सन २०२४ मध्ये मुरुड-एकदरा-राजापुरी-खोकरी मार्गावरील रस्त्यालगत स्लॅब ड्रेनचे काम पूर्ण केले होते. संबंधित कामाचे अंतिम बिल तयार करून देण्यासाठी कनिष्ठ अभियंता बो-हाडे यांनी तब्बल ३ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या मागणीमुळे त्रस्त झालेल्या ठेकेदाराने २८ मार्च २०२६ रोजी ACB रायगड-अलिबाग कार्यालयात तक्रार दाखल केली.
ACB पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. तडजोडीअंती २ लाख ५० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार ३० मार्च रोजी सायंकाळी मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात पंचासमक्ष कारवाई करण्यात आली. सुमारे ५.४० वाजण्याच्या सुमारास आरोपीने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच ACB पथकाने तिला रंगेहाथ पकडले. या वेळी संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
ही कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे, तसेच रायगडच्या उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक निशांत धनवडे व नारायण सरोदे यांनी पथकासह ही सापळा कारवाई यशस्वी केली. या पथकात उपनिरीक्षक विनोद जाधव, सहाय्यक फौजदार अरुण करकरे, हवालदार महेश पाटील, सुमित पाटील, सचिन आटपाडकर, नवदीत नांदगांवकर तसेच महिला पोलीस शिपाई मोनिका मोरे यांचा समावेश होता.
या घटनेमुळे “भ्रष्टाचाराला लिंगभेद नसतो” हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. सरकारी कामांसाठी लाच देणे-घेणे ही गंभीर समस्या असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुरुड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ACBने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी लाच मागत असल्यास तात्काळ तक्रार करून अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सहकार्य करावे.