भाजपचा विश्वास कुंटे यांच्यावर; अलिबाग-मुरूडमध्ये BLA-1 नियुक्तीने संघटनाला नवी धार, मतदार मोहिमेला वेग

अलिबाग | अमुलकुमार जैन
भारतीय जनता पार्टीच्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग-मुरूड विधानसभा क्षेत्रात महत्त्वाची संघटनात्मक घडामोड घडली आहे. पक्षाने मानस कुंटे यांच्यावर विश्वास दर्शवत त्यांची BLA-1 (विधानसभा प्रमुख) पदावर नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करत संघटन अधिक मजबूत करण्यासाठी भाजपने ठोस पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
मा. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सहीच्या अधिकृत पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील तसेच महामंत्री सतीशजी धारप यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. अलिबाग शहर सरचिटणीस म्हणून कार्यरत असलेल्या मानस कुंटे यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेत BLA-1 पदाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, नवीन मतदारांची नोंदणी, तसेच प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून त्यांचा सहभाग वाढवणे ही जबाबदारी या पदावर असते. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही नियुक्ती भाजपच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग मानली जात आहे.
मानस कुंटे यांनी या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. “पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास हीच माझी प्रेरणा आहे. ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने पार पाडण्याचा प्रयत्न करेन. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या नियुक्तीमुळे अलिबाग-मुरूड विधानसभा क्षेत्रात भाजपची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असून मतदार मोहिमेला अधिक वेग मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.