रसायनी येथील लोना इंडस्ट्रीज लि. मधील कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्काच्या लढ्याला अखेर सकारात्मक दिशा मिळाली आहे. कोकण श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संघर्षानंतर कंपनी व्यवस्थापनाने एक महिन्याच्या आत ठोस निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना कंपनीच्या थेट पे-रोलवर घेणे, शासन नियमानुसार वेतनवाढ आणि मूलभूत सुविधा देणे या प्रमुख मागण्यांसाठी कामगारांनी आंदोलनाची तयारी केली होती.
आज ३० मार्च २०२६ रोजी कंपनी गेटसमोर आंदोलनाची ठिणगी पडण्याआधीच पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करत दोन्ही बाजूंमध्ये चर्चा घडवून आणली. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांच्या उपस्थितीत कामगार नेत्या श्रुती म्हात्रे आणि कंपनीचे जनरल मॅनेजर संदीप गुप्ते, रमेश बर्गे तसेच मानव संसाधन विभागाचे विकास भगत व समीर भालेकर यांच्यात तब्बल दोन ते तीन तास सखोल चर्चा झाली. या चर्चेत २२ कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढत टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी नियुक्ती व वेतनवाढीबाबत लेखी आश्वासन देण्यात आले.
मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि विविध मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कामगारांना पाठिंबा दर्शवला. कामगार प्रतिनिधी सचिन मते यांनी प्रशासन व व्यवस्थापनाने संवादाची दारे खुली ठेवल्याबद्दल आभार व्यक्त केले. दरम्यान, दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते का, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.