रायगड जिल्ह्यातील माणगाव परिसरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर २ जून रोजी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला असून, दोन अल्पवयीन मुलींंसह एक महिला गंभीर जखमी झाली आहे. सदर अपघात गुरुकृपा हॉटेलजवळ रात्री साडेदहा वाजता घडला.
प्राप्त माहिती नुसार, सिंधुदुर्गकडून येणारी खासगी ट्रॅव्हल्सची बस (MH11 CH 7611) चालक कालिदास बाबुराव कोकरे यांच्या ताब्यात होती. सदर बस भरधाव वेगात असताना, गुरुकृपा हॉटेल समोर एक प्रवासी रिक्षा (MH06 BV 2193) थांबलेली असताना बसने जोरदार धडक दिली.
या अपघातात रिक्षाचालक अशोक भिकु सोनार (६५, रा. जुने माणगाव), परी अनिल सोनार (११), अश्विनी दळवी (३०), व तिची मुलगी साईशा दळवी (४) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर अशोक सोनार यांना तातडीने उपचारासाठी मुंबईला हलवले जात असताना, पेण- वडखळ दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
माणगाव पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला नोटीस देण्यात आली आहे. गु.रजि. क्र. ११९/२०२५, भादंवि कलम १२५ (अ), १२५ (ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार करत आहेत. तपासकार्य पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.