कोलाड रेल्वे स्थानक सुशोभिकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा संताप; “गाडीच नाही तर सौंदर्यीकरण कुणासाठी?”

Kolad station
कोलाड (श्याम लोखंडे) :
कोलाड आणि वीर रेल्वे स्थानकांचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नुकतेच सुशोभिकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि सध्या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले. मात्र, स्थानिक प्रवासी वर्गात याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सौंदर्यीकरण करूनही कोलाड स्थानकात सध्या फक्त एकच पॅसेंजर गाडी (दादर–रत्नागिरी) थांबते. तर दिवा–सावंतवाडी पॅसेंजर, जी कोरोना काळात बंद झाली, ती अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे या सुशोभिकरणाचा फायदा नेमका कोणाला? असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
कोकणात रेल्वे सुरु करण्यासाठी १९७७ साली मधु दंडवते रेल्वे मंत्री असतांना कोकण रेल्वेचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी ई. श्रीधरण यांना कोकण महामंडळाचे अध्यक्ष नेमून त्यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेच्या महामार्गाचे काम सुरु झाले. यानंतर १९८९ ते १९९०मध्ये रेल्वे मंत्री जॉज फर्नाडीस यांनी कोकण रेल्वे प्रकल्पाला चालना दिली. कोकणचा विकास व्हावा यासाठी पिढ्यान पिढ्या कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांनी कोकण रेल्वेसाठी दिल्या कोकण रेल्वे ही सुरु झाली परंतु जेथे कोकण रेल्वे सुरु झाली त्या पहिल्याच स्टेशनला रोरो सेवा सुरु झाली व धनदांडग्यांचा प्रश्न सुटला परंतु सर्वसामान्य प्रवाश्यांसाठी एकच गाडी थांबत असल्यामुळे प्रवाशी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कोलाड हे व्हाईट वॉटर राप्टिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण असुन बाजूला कुंडलिका नदी, हिरवेगार निसर्ग, धबधबे सह्याद्रीची नयनरम्य पार्श्वभूमी यासाठी ओळखले जाणारे कोलाड तसेच कोलाड परिसरातील गोवे येथे असणारे श्रीमती गीता द. तटकरे पॉलिटेक्निकल असल्यामुळे येथे महाराष्ट्राच्या कान्हाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात याच कॉलेजच्या बाजुने कोकण रेल्वे गेली आहे परंतु येथे कोणतेही लोकल सेवा सुरु नसल्याने विदयार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

कोलाड परिसरात वाडया वस्त्या धरून ७१ गावाचा समावेश होतो. येथून मुंबई जवळ असल्यामुळे पनवेल कोलाड ते वीर पर्यंत लोकल सेवा सुरु झाली तर उद्योगधंद्याना चालना मिळेल गृहिणी तसेच विद्यार्थी यांना पार्ट टाईम नोकरी ही करता येईल. तसेच कोलाड पासून पुणे हे नजिकचे ठिकाण असुन पुणे मार्गाकडे जाणाऱ्या लोकांचा ही फायदा होईल.सर्व बाबींचा विचार करता तसेच रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल व तरुणांना रोजगार ही मिळाले यामुळे दिवसातून तीन वेळा पनवेल कोलाड ते वीर पर्यंत लोकल रेल्वे सुरु करावी अशी मागणी प्रवाशीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *