हैदराबादवरून माथेरानला पर्यटनासाठी आलेल्या सहा तरुणांच्या अर्टिगा कारचा जुमापट्टी रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला. वाहन घाट उतरत असताना ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटले आणि कार लोखंडी रेलिंगवर आदळून थेट खालच्या वळणावर सिमेंट कठड्याला धडकली. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले असून एका तरुणीला किरकोळ दुखापत झाली. अपघाताची तीव्रता एवढी होती की कार हवेत उडून उलटली, मात्र सुदैवाने एअर बॅग्स उघडल्याने मोठा अनर्थ टळला.
ही घटना ८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. हैदराबादमधील गुंटूर जिल्ह्यातील साकेत राम, रेयूत त्रिलोक, काशू तेजस्विनी, रेहुक पूजिता, रेव्ह वैष्णवी आणि तेजस्वी इम्कोरल हे सहा जण माथेरान दर्शनासाठी आले होते. ७ जुलै रोजी ते माथेरानमध्ये दाखल झाले होते. पर्यटनानंतर परतीच्या वाटेवर असताना चालक त्रिलोकच्या कारचे ब्रेक घाटाच्या उतारावर फेल झाले. नियंत्रण सुटल्याने कार प्रथम लोखंडी रेलिंगवर आदळली आणि त्यानंतर ती हवेत उडून सिमेंट सुरक्षा कठड्याला धडकली. कार उलटून रस्त्यावर पडली आणि काही वेळ वाहतूक ठप्प झाली.
अपघातानंतर अर्धा तास कोणतीही मदत न मिळाल्याचे निदर्शनास आले. अपघाताची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून स्थानिक टॅक्सीच्या सहाय्याने रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी सांगितले की जखमींना डोके, हात व पायाला गंभीर मार लागले असून उपचार सुरू आहेत. या अपघातातून पर्यटक दैवगतीने वाचले असून एक मोठा अनर्थ टळला आहे.